या कथांमधून कौस्तुभला हेही कळते की भगवान विष्णूंचा दहावा अवतार, म्हणजे कल्की अवतार, कलीयुगात म्हणजेच आपण ज्या आधुनिक युगात आहोत, त्यात होणार आहे. चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या कौस्तुभच्या निरागस मनाने स्वतःलाच तो कल्की अवतार समजून घेतले आहे. त्याचा जिवलग मित्र मंग्या, ज्याला ही कल्पना तितकीच रोमांचक वाटते, कौस्तुभच्या विश्वासाला दुजोरा देतो.
काही योगायोगाने घडलेल्या घटनांमुळे कौस्तुभच्या कल्पनांना आणखी बळ मिळते. एकदा हे मनावर पक्के झाले की तोच कल्की अवतार आहे, त्याने हे गुपित अमोदला सांगितले. अमोद हा कौस्तुभच्या घरी भाड्याने राहणारा तरुण अभियंता विद्यार्थी आहे. मात्र, नास्तिक स्वभावामुळे अमोद याकडे फारसे लक्ष देत नाही.
कल्की अवतार असल्याच्या कल्पनेने भारावलेला कौस्तुभ इतका आत्मविश्वासू होतो की, तो खूप दिवसांपासून मनात असलेले एक मोठे साहस करण्याचा प्रयत्न करतो. या साहसादरम्यान त्याला दुखापत होते व पायाला फ्रॅक्चर होतो. ही घटना कौस्तुभच्या कल्पनारम्य जगाला जबर धक्का देते. त्याचे भावनांनी भरलेले स्वप्नांचे जग पूर्णपणे कोसळते.
कौस्तुभला वास्तविकता स्वीकारणे कठीण जाते आणि तो स्वतःच्या कोशात जाऊ लागतो. तो त्याच्या प्रिय मित्र मंग्यालाही टाळू लागतो, तसेच घरातील इतरांशीही संवाद टाळतो. त्याच्या या विचित्र वागणुकीमुळे डॉक्टर त्याच्या पालकांना मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्याचा सल्ला देतात. मात्र, सामाजिक लोकलाजेमुळे त्याचे आई-वडील हे पाऊल उचलत नाहीत.
कौस्तुभची आई पाहते की, सगळ्यांपासून दुरावलेला कौस्तुभ अमोदसोबत मात्र बऱ्यापैकी सहज आहे. त्यामुळे ती अमोदला कौस्तुभला या मानसिक गोंधळातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची विनंती करते. अमोद ही जबाबदारी स्वीकारतो आणि समस्येच्या मूळाशी जाण्याच्या प्रयत्नात मंग्याशी मैत्री करतो.
त्यानंतर त्याला कळते की कौस्तुभच्या अवतार बनण्याच्या कल्पनेवर आधारित ध्यासच या सर्वांचा मूळ कारण आहे. अमोद कौस्तुभला अवताराच्या संकल्पनेबद्दल वेगळा दृष्टिकोन सांगतो व हळूहळू त्याला समजवून त्याच्या मानसिक तणावातून बाहेर काढतो. अमोदच्या मदतीने कौस्तुभ आपले नैराश्य दूर करतो आणि आपला आत्मविश्वास परत मिळवतो.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb
Credit: Work is released under CC-BY-SA