आमच्या बद्दल
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक एक मराठी व्यक्ती असूनही मराठी चित्रपटसृष्टीची परिस्थिती तशी जेमतेमच. काही अपवाद वगळता २१ व्या शतकाला साजेसे चित्रपट आपल्याला बनवता आले नाहीत आणि रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन हि करता आले नाही. ना आपल्याला सुपरस्टार निर्माण करता आला. आता परिस्थिती बदलत आहे, मराठी चित्रपट कात टाकतोय हे मी लहानपणा पासून ऐकत आलोय पण तसं घडलेलं अजूनही दिसत नाही. तेच तेच बघून प्रेक्षक कंटाळले, त्यांनी मराठी चित्रपटांकडे कधीच पाठ फिरवली. प्रेक्षकांना दाक्षिणात्य चित्रपट आता जवळचे वाटू लागलेत. मराठी चित्रपट आशयावर चालतो हि चांगली गोष्ट आहे पण तांत्रिकदृष्ट्र्या मराठी चित्रपट कधी सक्षम होणार? नवीन फळीतील दिग्दर्शक चौकटी बाहेर विचार करताना दिसत नाहीत. आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत पण अजूनही मला २००६ साली प्रदर्शित झालेल्या “३००” चित्रपटाशी तुलना करावी असा ऐतिहासिक भव्य दिव्य चित्रपट मराठीत दिसला नाही. एवढच काय तर साधं मराठी चित्रपटसृष्टीला स्वतःच असं नाव देखील नाही. महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत त्यामुळे आपण पॅन इंडिया ची स्वप्न न पाहिलेलीच बरी.
एकूणच मराठी चित्रपटसृष्टीच्या अवस्थेला दिग्दर्शक, लेखक, निर्माते, कलाकार, प्रेक्षक, तुम्ही-आम्ही सगळेच जबाबदार आहोत. आणखी एक खंत मनात आहे, आज आयटी क्षेत्रात असंख्य मराठी तरुण-तरुणी काम करतात. तंत्रज्ञानावर हुकूमत असूनही त्यांनी मराठी चित्रपट, साहित्य, संस्कृती यांसाठी काही योगदान केल्याचं दिसत नाही. अर्थात याला काही मोजके अपवाद आहेतच. चित्रपट बनवणे हे काही माझं स्किलसेट नाही पण मराठी चित्रपटांसाठी काहीतरी करावं यासाठी या वेबसाईटचा प्रयत्न.
भविष्याबद्दल सकारात्मकता ठेऊन मराठी चित्रपटसृष्टी नव्याने झेप घेईल याबद्दल मला तिळमात्रही संशय नाही त्यासाठी बदल घडावे लागतील मराठी भाषेबद्दल आस्था निर्माण व्हावी लागेल.
(मराठी भाषेचा ऋणी)