कुठलीही गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी ती आधी स्वतःच्या मनाला भावली पाहिजे. पारू, या मुख्य स्त्री पात्राचा विचार मला दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात आला. मुंबईच्या या मध्यवर्ती ठिकाणी दाट लोकवस्ती आहे आणि नेहमीच विक्रेत्यांच्या गोंधळाने भरलेलं असतं. माझ्या लहानपणापासून मी हे ठिकाण पाहत आलो आहे. पुढे, प्रौढपणात मी या परिसराकडे छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून आणि लेखकाच्या दृष्टिकोनातूनही पाहू लागलो.
रात्री, ग्रामीण ठाण्यातून (मुंबईला लागून असलेला जिल्हा) आदिवासी स्त्रिया येऊन दादर रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या घाऊक फुलांच्या बाजारात जंगलात फिरून गोळा केलेली फुलं आणि पानं विकतात. या स्त्रिया 50 ते 90 किलोमीटरचा प्रवास करून, 30-40 किलो वजनाच्या गाठी घेऊन येतात आणि बाजार सुरू होण्याआधी (पहाटे) बाजाराजवळ जिथे जागा मिळेल तिथे विश्रांती घेतात. काही स्त्रिया त्यांच्या लहान मुलांनाही सोबत आणतात. बाजार सुरू झाल्यावर त्यांना साठवणुकीसाठी जागा नसल्याने फुलं आणि पानं तोट्यातही विकून टाकावी लागतात आणि नंतर परतीचा प्रवास सुरू होतो. त्यांचा 125-150 किलोमीटरचा प्रवास दररोज ठरलेला असतो. उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा असो, त्यांना आपला दिनक्रम न चुकता पार पाडावा लागतो, ना सुट्ट्या, ना सणांच्या आनंदासाठी वेळ. उलट, सण-उत्सव ही त्यांच्यासाठी जास्त कमाईची संधी असते.
ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाच्या छंदामुळे, मला ग्रामीण ठाण्यात या मेहनती स्त्रिया डोंगर-दऱ्यांतून फुलं-पानं गोळा करताना अनेक वेळा पाहायला मिळाल्या आहेत. त्यांच्याशी मी प्रेमाने त्यांच्या आयुष्याबद्दल आणि उपजीविकेबद्दल चौकशी केली आहे. त्यांच्या परिश्रम आणि कार्यक्षमतेला माझं मनापासून सलाम आहे.
‘गौराई’ या माझ्या चित्रपटाद्वारे, या स्त्रियांच्या दुःखाची जाणीव समाजाला करून देण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्यांच्या संघर्षांनी माझ्या मनावर कोरलेलं दु:ख मी या चित्रपटातून मांडलं आहे. माझी अपेक्षा आहे की, आपल्या समाजाला या दुर्लक्षित घटकांच्या व्यथा जाणवतील आणि संवेदनशीलता निर्माण होईल.
Credit: Work is released under CC-BY-SA